सध्या चीन मधून आलेल्या कोरोना व्हायरस ची चर्चा सर्वत्र रंगत असून आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या विषाणूने एकूण 25 जणांचा बळी घेतलेला आहे तर 830 जणांना अाजाराची लागण झालेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इतर देशांसोबतच भारत देशालाही सतर्कतेचा इशारा देत हा व्हायरस अत्यंत धोकादायक असल्याचे सांगितलेले आहे. चीन सोबतच आता थायलंड सिंगापूर मलेशिया या देशांमध्ये देखील या विषाणूचा धोका पसरत आहे,
हा धोका लक्षात घेऊन एकट्या मुंबई विमानतळावर 3997 प्रवाशांची खबरदारी म्हणून वैद्यकीय तपासणी केली गेली, त्यातून आठ संशयित रुग्ण रुग्णालयात ऍडमिट केले गेले आहेत.
हा धोका लक्षात घेता सामान्य माणसालाही या आजाराविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी आजचा दिवस आपण कोरोना व्हायरस व त्यासंबंधी लक्षणे काय असतात हे शिकण्यासाठी घालवणार आहोत. सध्या इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या कारोना व्हायरसच्या माहितीपैकी बरीचशी माहिती चुकीची असल्याकारणाने हा खटाटोप, यात सांगितली गेलेली माहिती एका रिसर्च पेपर मधून घेण्यात आलेली आहे ज्यात 41 रुग्णांवर अभ्यास केला गेला ज्याचा खर्च चिनी शासनाच्या तिजोरीतून करण्यात आला आहे. 24 जानेवारी 2020 रोजी हा अभ्यास thelancet.com या संकेत स्थळावर पब्लिश केला गेलाय.
2019च्या सरतेशेवटी चीनमधील वुहान शहरामध्ये न्युमोनिया ची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली. काळजीपूर्वक केल्या गेलेल्या वैद्यकीय तपासणी अंती असे लक्षात आले की या सर्व रुग्णांना कोरोना वायरस नावाच्या विषाणूचे इन्फेक्शन झालेले आहे, मात्र यावेळी आढळून आलेल्या विषाणूची जनुकीय संरचना पूर्वी बघण्यात आलेल्या विषाणू पेक्षा वेगळी आहे, यापूर्वीही मागच्या दोन दशकांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोना व्हायरस ने झालेले इन्फेक्शन बघण्यात आलेले आहे, त्यातील काही प्रकारचे कोरोना व्हायरस हे मवाळ स्वरूपातील आजारास कारणीभूत ठरतात मात्र त्यातील बीटाकोरोनाव्हायरस प्रकारातील दोन उपप्रकार अनुक्रमे 10% व 37% मृत्युस कारणीभूत ठरतात, यावेळी आढळून आलेले कोरोनाव्हायरस हे पूर्वीच्या विषाणू पेक्षा वेगळे आहे असे लक्षात येते. या वेळेच्या विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांमध्ये
98 % रुग्णांना ताप
76 % रुग्णांमध्ये खोकला
44 % रुग्णांमध्ये अशक्तपणा व स्नायूंचे दुखणे हे आढळून आले कमी प्रमाणात असलेले लक्षणांमध्ये
28 % रुग्णांमध्ये छातीत कफ तयार होणे
8 % लोकांमध्ये डोकेदुखी व
5 % लोकांच्या थुंकीतून रक्त येणे
3% लोकांमध्ये अतिसाराचा त्रास
लागण झालेल्या रुग्णांमध्ये लागण झाल्याच्या सरासरी आठ दिवसात 55% रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होण्याची सुरुवात झाली.
63 % रुग्णांमध्ये lymphocytopenia ( रक्तातील पांढऱ्या पेशीतील lymphocyte प्रकाराच्या पेशी कमी होणे)
व्हायरस ची बाधा झालेल्या सर्व रुग्णांमध्ये निमोनिया सारखे लक्षण बघायला मिळाले व यातल्या 32 % रुग्णांना आयसीयूमध्ये ऍडमिट करायची गरज पडली, जातील 15 % लोकांचा आजारामुळे जीव गेला.
अजून तरी भारतात हा आजार आलेला नाही तरी आपण अशात बाधित देशांमध्ये जाऊन आला असाल, किंवा त्या देशात जाऊन आलेल्या व्यक्ती सोबत आपण राहिला असाल ज्यास वरील नमूद केलेली लक्षण आहेत तर कदाचित आपल्याला या आजाराची लागण झालेली असू शकते यासाठी आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्या व स्वतःला पुढे होणार्या त्रासापासून वाचवा. ही माहिती आपल्या प्रियजनांना, मित्रांना, मैत्रिणींना, कुटुंबाला फॉरवर्ड करा या आजाराविषयी काही शंका असल्यास खालील कमेंट बॉक्स मध्ये त्या शंका विचारा, आपण निरोगी राहा व इतरांना हे वैद्यकीय ज्ञान वाटून त्यांनाही निरोगी राहण्यास मदत करा. आपणास प्रभू निरोगी आयुष्य प्रदान करो ही सदिच्छा..
- डॉ. प्रशांत महाले.
Update-
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार भारतातील या आजाराचा पहिला रुग्ण सापडला आहे , हा रुग्ण चीनमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी असून तो मूळचा केरळ राज्यातील आहे .